tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी महाराज चरित्र सारांश

shri-tembe-swamiअनेक उपासना पद्धतींनी संपन्न असलेल्या, या दत्त संप्रदायातील सनातनी शाखेत श्रीपादवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्री नारायणस्वामी, श्री गोविंदस्वामी या परंपरेत, श्रीवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामींचा अतिआदराने उल्लेख व समावेश होतो. कोकणातील सावंतवाडी संस्थानातील माणगावातील गणेशभट टेंब्ये व सौ.रमाबाई यांच्या पोटी शके १७७६, श्रावण कृष्ण पंचमीस, रविवार दि.१३/०८/१८५४ “वासुदेव” अर्थात प.प. स्वामींचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी वासुदेवाची मुंज झाली. यानंतर त्रिकाळ स्नानसंध्या. अग्निकार्य, नित्य गुरुचरित्र वाचन, भिक्षा मागून वैश्वदेव-नैवेद्य करून भोजन, असे नित्य आन्हिक तो करू लागला. याच बरोबर वेदाध्ययन, याज्ञिक, संस्कृत, ज्योतिषशास्त्र तसेच अष्टांग योगाभ्यास सुरु केला.

व्रतोपवासामुळे त्यांचे शरीर व मन अत्यंत निर्मळ झाले होते. यामुळे योगाच्या अंतरंगात त्यांचा सहजप्रवेश होऊन, त्यांना सर्वज्ञता लाभली होती. वासुदेवशास्त्री माणगावात विद्वान व शास्त्रज्ञ म्हणून गणले जाऊ लागले.

रांगणागडचे हवालदार बाबाजीपंत गोडे यांच्या ‘बयो’ नावाच्या मुलीशी वासुदेवशास्त्री यांचा विवाह झाला, विवाहानंतर शास्त्रानुसार वासुदेवशास्त्री पंचयज्ञ, नित्य पंचायतन पूजा व स्मार्ताग्नी करू लागले. याच वेळी त्यांनी गायत्रीचे पुरश्चरण केले. एकदा ते स्वप्न दृष्टांतानुसार वाडीस गेले असता तेथे श्रीगोविंदस्वामी या ब्रह्मज्ञानी संन्याशाचा यांना कृपानुग्रह होऊन, श्रीदत्तसंप्रदायाची दीक्षा व गुरुमंत्र लाभला.

यानंतर (इ.स. १८८३ वैशाख शुद्ध पंचमीस) कागलहून आणलेल्या दत्तमूर्तीची वासुदेवशास्त्री यांनी माणगावी स्थापना झाली, इथे दत्तगुरूंनी ७ वर्षे विविध लीला केल्या. या नंतर त्वरित माणगाव सोडण्याच्या श्रीदत्ताज्ञेने वासुदेवशास्त्री पत्नीसह नरसोबावाडीला गेले. यानंतर ‘उत्तरेस जा’ या आज्ञेनुसार कोल्हापुर. औदुंबर, पंढरपूर, बार्शी अशी तीर्थ क्षेत्रे करीत गोदाकाठी गंगाखेडास (जिल्हा परभणी) आले. येथे शके १८१३ वैशाख कृष्ण १४, शुक्रवार दुपारी पतीच्या पायावर मस्तक ठेवून अन्नपूर्णा बाईंनी देहत्याग केला. यानंतर १४ व्या दिवशी वासुदेवशास्त्रीनी संन्यास घेतला.

त्यांनी उज्जयिनीस श्रीनारायाणनंदसरस्वती स्वामींकडून दंड घेतला. स्वतः कर्म-भक्ती-योग-ज्ञान अशा उपासनामार्गांचा अवलंब करून त्यातील ध्येयपदवी प्राप्त करून. अनेक मुमुक्षु भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी तसेच दत्तभक्तीचा प्रचार करण्यात घालविले. ते दत्तप्रभूंच्या आदेशवरून कठोर नैष्ठिक सन्यस्त जीवन जगले. संपूर्ण जीवन महाराष्ट्रापासून हिमालयापर्यंत अनवाणी फिरून वैदिकधर्म व श्रीदत्तसंप्रदायाचा प्रचार केला.

संन्यासाश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्तभक्ती अशा अनेक वैशिष्ठ्यांनी संपन्न असणारे स्वामीजी उत्तम वैद्य, मंत्रसिद्ध, यंत्र-तंत्रज्ञ, उत्कृष्ठ ज्योतिषी, मराठी व संस्कृत आध्यत्मिक साहित्यातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिद्धकवी, वक्ते, सिद्ध हठयोगी व उत्कृष्ठ दत्तभक्त होते.

त्यांनी श्रीदत्तपुराणासारख्या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती करून, अनादी दत्तसंप्रदायास एक संहिता व निश्चित तोंडावळा दिला, ज्यात वेदपादस्तुतीसारखी अलौकिक कृती समाविष्ट आहे. दत्तगुरूंच्या आज्ञेने घडलेल्या श्रीगुरुचरित्रासारख्या दिव्य ग्रंथाचा केवळ मराठी भाषेमुळे अखिल भारतीय भक्त आध्यात्मिक लाभ घेऊ शकत नव्हते, यासाठी यांनी सदर ग्रंथांची समश्लोकीसंहिता व द्विसाह्स्त्री संहिता नावाचे संस्कृत संक्षेप करून, सर्वांपर्यंत यातील भक्तीविज्ञान पोहचविले. स्त्रियांदिकांसाठी सप्तशती गुरुचरित्रसार नावाने यांनी गुरुचरित्राचा प्राकृतसंक्षेप केला. दकारादिसह्स्रनाम, सत्यदत्तव्रत अशा अनेक वैशिष्ट पूर्ण वाङमयाची व पंचपाक्षिक नावाने एक स्वतःची ज्योतिष पद्धती निर्माण केली. अनेक देवता सत्पुरुष नद्या इ.वर विपुल स्तोत्ररचना व अभंगरचना केली. त्यांनी रचलेली करुणात्रिपदी आणि इतर भक्ती रचना महाराष्ट्राच्या घराघरात आजही गायल्या जातात.

याच बरोबर नृसिंहवाडीसारख्या जागृत दत्तस्थानी सुयोग्य उपासनापद्धती लावून देण्याबरोबरच पीठापुरचे श्रीपादवल्ल्भांचे जन्मस्थान, कुरवपुरचे साधनास्थान व कारंजाचे गुरुनृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान, अशा स्थानांचे दैवीमाध्यमातून संशोधन करून दत्त सांप्रदायीकांच्यावर शाश्वत उपकार केला आहे. स्वामी महाराजांचे एकूण २३ चातुर्मास ठिकठिकाणी झाले.

दत्तअवतारी प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी वयाच्या ६० व्या वर्षी मंगळवार आषाढ शुक्ल प्रतिपदा शके १८३६, दिनांक २४ जून १९१४ या दिवशी नर्मदाकिनारी श्री क्षेत्र गरुडेश्वर, (जिल्हा नर्मदा, गुजरात) मुक्कामी समाधी घेतली.

प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे कार्य, त्यांच्या ग्रंथरचना, परीव्रजाकावास्थेतील भ्रमण, त्यांचे कार्य पुढे चालविणाऱ्या विविध संस्था यांची समग्र माहिती देणारी वेबसाईट श्री वासुदेव निवास यांनी निर्माण केली आहे. वेबसाईटला भेट देण्यासाठी http://www.shrivasudevanandsaraswati.com/ या लिंक वर क्लिक करा.

प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजकृत प्रश्नावली पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे तसेच गुरुपरंपरेतील महापुरुषांची ध्वनिमुद्रित चरित्रे ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.  

<< गुरुतत्व पृष्ठावर जा