श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

श्रीगुरु: शरणम्

श्रीमद्भगवद्गीतेत भगवंतांनी “सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट: | म्हणजे मी प्रत्येकाच्या हृदयात आहे” असे आश्वासन दिले आहे. स्वामी विवेकानंदांच्या अनेक शिष्यांपैकी स्वामी बोधानंद नावाचे शिष्य होते. स्वामी बोधानंदांनी वरील भगवंताच्या वाणीचे महत्व, स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातील प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगातून समजावून सांगितले आहे.

स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की स्वामी श्रीरामकृष्ण परमहंसांचे जीवन दर्शन म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन आहे. म्हणून ‘श्वासे श्वासे श्रीरामकृष्णनाम स्मरणम्’ या भूमिकेतूनच स्वामी विवेकानंद स्वामी श्रीरामकृष्णांचे पूजन करीत असत. एके दिवशी स्वामी विवेकानंदांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावले. ते शिष्यांना सांगतात “आपण स्वामी श्रीरामकृष्ण परमहंसांचे पूजन करू या.” सर्वजण स्वामी श्रीरामकृष्ण परमहंसांच्या मंदिरात आले. स्वामी विवेकानंद सर्वांना सांगतात “आता आपण पूजन सुरू करणार आहोत. त्यापूर्वी आपण सर्वजण थोडा वेळ शांतपणे डोळे मिटून बसू आणि सद्गुरूंचे ध्यान करू.” सर्व शिष्य ध्यानामध्ये मग्न
झाले. अचानक स्वामी विवेकानंद आपल्या जागेवरून उठले. त्यांनी फुलांचे ताट हातात घेतले. स्वामीजींनी ताटातील एकेक फुल आपल्या एकेका शिष्याच्या मस्तकावर ठेवले. ध्यानानंतर शिष्यांनी डोळे उघडले. त्यावेळी मस्तकावरील फूल बघून सर्व शिष्यांना आश्चर्य वाटले. त्यांचे हृदय भरून आले. त्यांच्या मुखातून आपोआप शब्द बाहेर पडले ते असे “श्रीगुरु: शरणम् | श्रीगुरु: शरणम्|”.

स्वामी बोधानंद या प्रसंगातील रहस्य स्पष्ट करतात. ते सांगतात “भगवंत सर्वांच्या हृदयात आहे म्हणजे तो माझ्या शिष्यांच्याही हृदयात आहे” या विश्वासाने स्वामी विवेकानंदांनी आपल्या शिष्यांचे पूजन केले.” स्वामी बोधानंद पुढे सांगतात “उच्च आध्यात्मिक भूमिका असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या ठिकाणी सर्व समभाव होता. त्यामुळे आम्हाला सुद्धा ‘गुरुतत्व हेच ईश्वरीतत्व आहे’ याचा खरा अर्थ समजला. कालांतराने स्वामी विवेकानंद स्वामी श्रीरामकृष्ण परमहंसांच्या मंदिरमधून बाहेर आले. त्यावेळी स्वामी विवेकानंद अत्यंत प्रसन्न व तेज:पुंज दिसत होते. त्यांच्या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष ईश्वराचेच दर्शन झाले. हे सत्य आहे.”

तात्पर्य, स्वामी विवेकानंदांची साधना, उपासना आणि सद्गुरूनिष्ठा सर्वश्रेष्ठ होती. ‘सद्गुरूंचे ध्यान’ अर्थात ‘ब्रह्ममय होणे’ याची प्रत्यक्ष अनुभूती स्वामी विवेकानंदांनी शिष्यांना दिली. त्यांना त्रिवार अभिवादन करू या. संत कबीर म्हणतात,
‘हृदय के अंदर आनंद ही आनंद।’

……………………..

मन करा रे प्रसन्न >>

<< अनुभवे पातले, तद्-रूपता