सगुण निर्गुण
बुद्धी
बुद्धि’ म्हणजे चैतन्य शक्तीची अंतःकरणांत निर्माण झालेली ‘निश्चयात्मक वृत्ति.’ प्रत्येक प्राणिमात्रांत योग्य रूपांत ही ‘बुद्धि’ सुस्थिर आहे. संकल्प-विकल्प, कर्तव्य-अकर्तव्य, यांचा निर्णय करणारी ‘बुद्धि’च आहे. भगवंताचे स्वरूप समजण्याची शक्तीही ‘बुद्धि’तच असते. म्हणून भगवंताला प्राप्त करून घेण्याकरिता ‘बुद्धि दे रघूनायका’ अशी श्रीसमर्थांची प्रार्थना आहे.
“विश्वात्मक-ईश्वराचे दर्शन” भिन्न प्रकारांनी करून देणारी ‘सहा शास्त्रे’ आहेत. या शास्त्रांनी “‘बुद्धि’ सर्व कार्य करणारी आहे” असे सांगितले आहे. “अश्रद्धा, अज्ञान, ‘बुद्धि’ला मान्य न होणे (असंभावना) हे दोष आहेत” असे शास्त्रे सांगतात. हेही बरोबर, तेही बरोबर अशा विचाराने निर्णय होत नाही. शास्त्रकारांनी हाही दोष मानला आहे. हे सर्व दोष ‘बुद्धि’वरील आवरण होय. शास्त्रांचे सिद्धांत, शब्द-वाक्य-विचार, आत्मबल-उपासना, भक्ति यांनी दोष/आवरण दूर होतात व ‘बुद्धि’ निर्दोष होते. परंतु हा अभ्यास सांगणाऱ्या सद्गुरूंवर विश्वास पाहिजे. भक्ति बुद्धिची प्रेरक शक्ती आहे. या विश्वासामुळे सुसंस्कृत झालेल्या ‘बुद्धि’त ‘विश्वात्मक देवाचे’ दर्शन होते. योगी पिप्पलायनांनी एका उदाहरणाद्वारे हे स्पष्ट केले आहे. आरसा आहे. त्यावर धूळ असली की प्रतिबिंब दिसत नाही. धूळ दूर करताच प्रतिबिंब दिसते. तसेच सद्गुरूंकडून प्राप्त अभ्यासाने ‘बुद्धि’रुपी दर्पणावरील अज्ञान-अश्रद्धा हे दोष (धूळ) दूर झाले की ‘ईश्वर-दर्शना’चा अनुभव प्राप्त होतो. याकरिता प्रत्येकाने शास्त्र-अभ्यास व गुरुकृपा संपादन करणे आवश्यक आहे.
‘अनुभवजन्य बुद्धि’ला सर्व विषय ज्ञात होतात. अशा ‘बुद्धि’च्या बळावर मनुष्य यशस्वी होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सम्राट चंद्रगुप्त मौर्यकालीन श्रेष्ठ श्रीचाणक्य होय. श्रीचाणक्य बुद्धिमान, त्यागी, तेजस्वी, धैर्यशील, सर्वगुणसंपन्न राजनीतिज्ञ होते. आपल्या ‘बुद्धि’सामर्थ्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. ‘बुद्धिस्तु मा गान्मम||’ हे त्यांचे विचार सुप्रसिद्ध आहेत. ते विनम्रपणे म्हणतात, “माझ्या गुरूंनी मला राष्ट्रकल्याणाच्या मार्गाचा (श्रेयस्) अभ्यास सांगितला. म्हणून शत्रूच्या सामर्थ्यापेक्षा माझ्या ‘बुद्धि’चे सामर्थ्य श्रेष्ठ आहे असा मला विश्वास आहे. सद्गुरूंकडून प्राप्त तेजस्वी ‘बुद्धि’ सदैव स्थिर राहो हीच प्रार्थना आहे.” श्रेष्ठ श्रीचाणक्यांचे क्षात्रतेजस्वी-विचार भारतातील तरुण पिढीला प्रेरक आहेत. ‘बुद्धि’ ही ईश्वरदत्त देणगी आहे. तिचा सदुपयोग करणे आपल्या हाती आहे असे संत दयाळनाथ वर्णन करतात –
“बुद्धिचे लेणे| ईश्वराचे देणे”
……………………..