tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे
   

सगुण निर्गुण

गजेंद्र

‘गजेंद्र’ म्हणजे ‘हत्तींचा इंद्र, हत्तींचा राजा’. भागवतपुराणात ‘गजेंद्रउपाख्यान’ आहे. पतंजलि मुनि सांगतात “पूर्वजन्मीच्या संस्कारांचे स्मरण बुद्धिमध्ये होते.” ‘भक्ति बुद्धीची प्रेरक शक्ति असल्याने’ स्तोत्रपठणाचा उपयोग कोणत्याही जन्मामध्ये उपकारक असतो. या रहस्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हें ‘गजेंद्रउपाख्यान’ होय.

गजेंद्र एकदा आपल्या परिवारासह श्रेष्ठ त्रिकुट पर्वतावरील सरोवरात जलक्रीडा करीत असताना मगराने त्याला पाण्यात ओढले. प्रचंड सामर्थ्यसंपन्न गजेंद्र मगरासमोर दुबळा ठरला. परंतु पूर्वजन्मी पठण केलेले स्तोत्र गजेंद्राला आठवले. त्याच्या बुद्धीत ईश्वरीतत्त्वाचे ज्ञान स्थिर होते. तो आर्त प्रार्थना करतो: “हें विश्व चैतन्यस्वरूप आहे, चैतन्य जगाचे मूळ कारण आहे, त्याची दृष्टी समान आहे, जो सर्वांना पहात आहे तो मलाही पहात आहे. तो प्रभू माझा रक्षणकर्ता आहे.”

गजेंद्राने कोणत्याही देवतेच्या नावाने आवाहन केलें नाहीं. चैतन्य शब्दातील ‘च’ अक्षर उच्चारताच चैतन्याने सर्वदेवस्वरूप ‘श्रीहरि (गलावतार)’ नवीन अवतार धारण केला. तें ‘वेदमय गरूडावर’ आरुढ झालें. गजेंद्राच्या आर्त प्रार्थनेने ‘प्रभू’ मनाच्या गतीपेक्षाही वेगवान गतीने गजेंद्राजवळ आले. भावुक गजेंद्राने अश्रुपूर्ण डोळ्यांनी कमळ अर्पण केले. प्रभु त्याचा प्रेमाने स्वीकार करून मगरावर सुदर्शन चक्राचा प्रहार करतात व शरण आलेल्या गजेंद्राची सुटका करतात. ‘आर्त भक्तीच’ श्रेष्ठ आहे.

भक्ताच्या आर्त हाकेने भगवंत धावून येतात हें एका प्रसंगातून पाहूं. द्रौपदीला द्वादशीच्या दिवशी श्रीकृष्णाला भोजन देण्याची इच्छा होते. युधिष्ठिर अर्जुनाला विचारतो “श्रीकृष्णाला घेऊन येण्यास किती वेळ लागेल?” अर्जुन म्हणतो, “तीन दिवस.” नकुल “सहा दिवस” व सहदेव “बारा दिवस” म्हणतात. परंतु भीम म्हणतो, “मी लगेच आणतो.” भीम श्रीकृष्णाचे स्मरण करीत सर्व सामर्थ्यानिशी गदा हवेत गरगर फिरवून आकाशात उंच फेकतो व म्हणतो, “देवा, गदा माझ्या डोक्यावर पडण्याआधी या.” हें उद्गार व गदेचा भयंकर आवाज द्वारकेत श्रीकृष्ण ऐकतात. भोजनाचे ताट बाजूला सारून श्रीकृष्ण ताबडतोब निघून हस्तिनापुरात येतात. सद्गदित होऊन भीम म्हणतो, “देव माझा माझा माझा, मी देवाचा.” श्रीकृष्ण आगमनाने सर्वजण आनंदित होतात. ‘आर्ततेने’ संकल्पपूर्ती होते हेंच खरे.

तात्पर्य-
‘आर्तभक्तीची पशु-पक्षांनाही युक्ती|
मानवहो, तुम्हीही करा अशीच भक्ती||’

……………………..

दास आम्ही हे घरदार  >>

<< वाङ्मयमूर्ती-प्रभूची