tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सगुण निर्गुण

स्तुती

ईश्वरप्राप्ती हेंच मानवाचे उच्चतम ध्येय आहे. भगवत्भक्तीनेच उत्कर्ष व कल्याणप्राप्ती होते. मनुष्य, जीवनातील पूर्णतेसाठी प्रयत्नशील असतो. प्रयत्न यशस्वी व्हावा व सर्व गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी तो भगवंताकडे धावतो, त्याची प्रार्थना करतो. याला ‘स्तुति,’ ‘स्तोत्र’ म्हणतात. ‘स्तोत्र’ म्हणजे गुणवर्णन. प्रत्येक जण स्तुतिप्रिय आहे. भगवंत वस्तुत: पूर्णकाम, निष्काम आहे, परंतु जीवांच्या कल्याणाकरीता त्याने ‘सगुणता स्वीकारून स्तुतिप्रियता अंगिकारली’.

वेद भगवंताचे निःश्वास आहेत म्हणून प्रथमतः ऋषीमुनींनी निसर्गपर देवतांची स्तोत्रे रचून स्तुति केली व “निसर्गाकडे चला” असा उपदेश केला. वेदातील विचार हे मानवतेची गाथा आहेत, उदाहरणार्थ, ‘समानी हृदयानि व:|,’ एकमेकांची मने ओळखा व एकीने रहा, व्यक्ति-कुटुंब-समाज-राष्ट्र बलशाली करा. कालांतराने संतमहात्म्यांनी देवतांची ‘स्तुति’ करण्यासाठी स्तोत्ररचनेस प्रारंभ केला. ‘स्तुति-स्तोत्राने’ देवता शीघ्र प्रसन्न होऊन ‘सुखशांतीश्रीकीर्ति’ यांची प्राप्ती होते असे ‘महर्षिव्यास’ म्हणतात.  

मनुष्य पैशासाठी श्रीमंत लोकांची आदराने स्तुति करतो. तशीच त्याने मनापासून परमेश्वराची स्तुति केली तर तो निश्चित सुखी होईल. परमात्म्याच्या स्तुतिने ईश्वर कसा मदत करतो याचे उदाहरण पाहू. एक धनिक रोज मंदिरात जायचा. मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेल्या दोन अंध याचकांची प्रार्थना तो रोज ऐकायचा. खालच्या पायरीवरचा याचक “भगवंत कल्याण करणारा आहे” असे म्हणत असे आणि वरच्या पायरीवरचा “या गावातला धनिक माझे कल्याण करणारा आहे” असे म्हणत असे. एके दिवशी धनिक खिरीच्या पात्रात हिऱ्याची अंगठी लपवून, नोकरास वरच्या पायरीवरच्या याचकाला देण्यास सांगतो. धनिक दुसऱ्या दिवशी येऊन बघतो तर खालच्या पायरीवरचा याचक तेथे नसतो. पण वरच्या पायरीवरचा याचक अजूनही तिथेच बसून ‘तीच प्रार्थना’ करतो याचे त्याला आश्चर्य वाटते. धनिक त्याला विचारतो, “अरे, तू खीर खाल्लीस कां?” याचक म्हणतो, “हो, परंतु थोडी खाऊन उरलेली खीर मी खाली बसलेल्या याचकाला दिली.” धनिकाच्या लक्षात येते की भगवंताची स्तुति करणाऱ्याचीच ‘प्रार्थना’ सफल झाली. धनिक देवाला म्हणतो, “खरोखर तूच श्रेष्ठ आहेस.”

‘स्तुति’चे महत्त्व संत श्रीतुकाराममहाराजांच्या अभंगातून स्पष्ट होते – 

‘वेडें वांकडें गाईन| परि तुझाची म्हणवीन||

मज तारीं दीनानाथा| ब्रीद साच करी आतां||’

……………………..

श्रद्धा >>

<< स्मृती स्मरण