Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
श्रद्धा
‘श्रद्धा’ म्हणजे एखाद्या गोष्टीने धारण-पोषण होईल असा विश्वास. देवता-गुरुवचन-शास्त्रवचन यांवर असलेला दृढनिश्चय, आत्यंतिक भक्ति म्हणजे ‘श्रद्धा’ होय.
उपनिषद् याचा अर्थ ‘ब्रह्माचे ज्ञान’. ‘प्रश्नोपनिषदा’तून ‘श्रद्धा भगवंताचीच निर्मिती आहे’ असा उल्लेख मिळतो. पिप्पलाद ऋषिंचे सहा शिष्य – कबंधी, भार्गव, कौसल्य, गार्ग्य, सत्यकाम, सुकेश यांनी विचारलेले तात्त्विक प्रश्न व त्यांची उत्तरे म्हणजेच ‘प्रश्नोपनिषद्’. एकदा कोसल (सध्याचा उत्तरप्रदेश) देशाचा राजकुमार-हिरण्यनाभ सुकेशला “सर्व कलांनीयुक्त असा कोण आहे?” असा प्रश्न विचारतो. राजपुत्राच्या प्रश्नाचे उत्तर सुकेश जाणत नसल्याने तो पिप्पलाद ऋषिंना विचारतो. ते सांगतात, “सर्वश्रेष्ठ परमात्माच सर्व कलांनी युक्त असून त्या कला त्याच्यापासूनच उत्पन्न झाल्या. हिऱ्याचे जसे पैलू असतात तसे परमात्म्याच्या या कला आहेत. या कलांपैकी प्रथमत: ‘प्राण’ निर्माण झाले. यानंतर दुसरी कला ‘श्रद्धा’ निर्माण झाली आणि नंतर पंचमहाभूतादिक कलांची (इंद्रिय, मन, इत्यादि) निर्मिती झाली. सर्वत्र असणारा ‘परमात्मा सर्वांच्या हृदयात स्थित आहे’ म्हणून प्रत्येक मनुष्य ‘श्रद्धाळू’ आहे.
भगवंताने भगवद्गीतेमध्ये ‘श्रद्धया-अर्चितुम्-इच्छति’ असे म्हटले आहे. याचा अर्थ, जो भक्त ज्या देवतास्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो, त्या भक्ताची त्याच्या देवतेवरील श्रद्धा परमात्मा दृढ करतो. “सगळे काही माझेच स्वरूप आहे म्हणून आपल्या आवडत्या देवतेचे श्रद्धेने पूजन-उपासना करा” असे दयाळू भगवंताने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे. ही त्याची मोठी उदारता आहे, निष्पक्षता आहे कारण तो सर्व प्राणीमात्रांचा ‘सुहृद’ आहे. भक्तांची ‘श्रद्धा’ दृढ करून भगवंत त्यांचे संरक्षण व कल्याण करतो.
भगवद्भक्त सूरदास अंध होते. ध्यानावस्थेत ते रस्ता चुकले. कोणीतरी त्यांचा हात धरून त्यांना घरी आणले. सूरदास ‘त्याला’ ओळखतात. ते त्याचा हात घट्ट धरतात. घरी येताच ती व्यक्ती हात झिडकारून निघून जाते तेव्हा सूरदास म्हणतात, “तू जरी हात सोडलास तरी मी मनाने तुला घट्ट धरून ठेवले आहे. जा तुला कुठे जायचे तिथे.” हे श्रद्धारूपी ज्ञानचक्षुंचे उत्तम उदाहरण आहे. ‘श्रद्धे’चे महत्व वर्णन करताना श्रीज्ञानेश्वरमाऊली म्हणतात –
‘पैं जो जिये देवतांतरीं| भजावयाची चाड करी| तयाची ते चाड पुरी| पुरविता मी||
……………………..