सगुण निर्गुण
गुरुकृपा
मानवी जन्माची प्राप्ती ही भगवंताचीच कृपा आहे. परंतु अनंत विचारांचा गुंता, त्यामुळे त्याचा अनुभव येत नाही. त्यासाठी सद्गुरूकृपा आणि स्वाध्याय यांची आवश्यकता आहे. प्रत्येका जवळ जरी ज्ञान असले तरी सद्गुरूकृपेने व श्रीगुरुंच्या सानिध्यात स्वाध्यायाने ते ज्ञान दृढ होते व विचारांचा गुंता कमी होऊन प्राप्त झालेल्या ज्ञानाने आनंदाची प्राप्ती होते.
कोणी कितीही ज्ञानी असला तरी सद्गुरूकृपेशिवाय ज्ञान सर्वांगपरिपूर्ण होत नाही. एका उदाहरणाद्वारे समजावून घेऊ. एखाद्या चित्रकाराने चित्र रेखाटले तरी तज्ञाच्या अभिप्रायावर चित्रकाराला आपले चित्र निर्दोष आहे याची खात्री पटते आणि तो आनंदीत होतो. दुसरे उदाहरण, सोन्यावरील अधिकृत शिक्का पाहून त्याच्या अस्सलपणाची खात्री पटते. यावरून आपल्यापेक्षा श्रेष्ठ श्रीगुरुस्थान आवश्यक आहे असे तात्पर्य आहे. एक घडलेला प्रसंग पाहू. श्रीशुकाचार्यांची वृत्ती ज्ञानमय होती व त्यांचे स्वरूप सर्वत्र व्यापून होते, तरीही त्यांचे वडील, श्रीव्यासमहर्षि त्यांना सांगतात, “विदेही जनकराजा श्रीगुरुस्थानी आहेत. तुम्ही ज्ञानी असला तरी श्रीगुरुकृपेशिवाय ज्ञान स्थिर होणार नाही.” श्रीशुकाचार्य जनकांकडे येतात. जनकांचे राजवैभव पाहून त्यांना श्रीगुरु कसे मानावे हा संभ्रम पडतो. एवढ्यात एक सेवक “राज्यावर संकट आलेले आहे” असे सांगतो. जनकराजांचा ईश्वरावरील विश्वास, ज्ञानसाधना, आत्मबल श्रेष्ठ असते. ते शांतपणे म्हणतात, “ईश्वराच्या इच्छेने सर्व संकट दूर होईल”. श्रीशुकाचार्य सर्व बघत व ऐकत होते. इतक्यांत सेवक “संकट टळले” असे सांगतो. संकटात स्थितप्रज्ञ अशा जनकराजांना पाहून श्रीशुकाचार्य त्यांचे शिष्यत्व स्वीकारतात. जनकराजांकडून श्रीशुकाचार्यांना गुरुकृपा प्राप्त झाली व अनेक वर्षेपर्यंत स्वाध्यायाने श्रीशुकाचार्यांचे ज्ञान दृढ होऊन ते स्थितप्रज्ञ झाले. उपजत ज्ञान असले तरी श्रीगुरुकृपेची आवश्यकता असतेच हा संदेश यातून मिळतो.
आजच्या काळात आई, वडील व ज्ञान देणारे गुरु यांचेकडून ज्ञानप्राप्ती करून घ्यावी. गुरु-शिष्याचे नाते माता-शिशुसारखे आहे. श्रीगुरु शिष्याला ज्ञानामृत देऊन त्याला परिपूर्ण करतात आणि आईची भूमिका पार पाडतात म्हणून त्यांना ‘गुरुमाऊली’ असे प्रेमाने संबोधतात.
श्रीस्वामिमहाराज रचित ‘गुरुस्तुति’ पाहू –
‘जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा| जो नित्य राहे उदित प्रभात्मा|
ज्ञानें जयाच्या नर हो कृतार्थ| तो पूर्ण आनंद गुरु समर्थ||’
……………………..