tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे
  

सगुण निर्गुण

खगेंद्र अर्थात् गरुड

परमात्म्याच्या वैविध्यपूर्ण सृष्टिनिर्मितीच्या संकल्पाने प्रजापतींनी देव, दानव, दैत्य, मनुष्य, पशु, पक्षी, सर्प अशा अनेक जीवांची निर्मिती केली. सूक्ष्म कीटकापासून प्रत्येक जीवाला प्राप्त असलेले विशिष्ट सामर्थ्य ही ‘भगवंताची दया’ होय. असा विशेष सामर्थ्य प्राप्त झालेला ‘खगेंद्र’ अर्थात् ‘गरुड’, ‘पक्षांचा इन्द्र’, ‘पक्षांचा राजा’ आहे.

महाभारतामध्ये “इंद्रापेक्षासुद्धा प्रबल अलौकिक सामर्थ्यसंपन्न प्राणी निर्माण व्हावा” या सर्व ऋषिंच्या प्रार्थनेमुळें ईश्वरकृपेने ‘गरुडाचा’ जन्म झाला. त्याचे ‘विशालकायरूप’, ‘सुपर्ण’ असेंही वर्णन आहे. जन्मापासूनच ‘गरुडाने’ सर्व संघर्षांचा जिद्दीने सामना केला. एका प्रसंगी स्वर्गातून अमृतकलश आणतांना ‘गरुडाचे’ इंद्रदेवाबरोबर युद्ध झालें. तेव्हां वज्राचे आघात होऊनही ‘गरुड’ डगमगला नाहीं. त्याच्या अतुलनीय सामर्थ्यामुळें इंद्रदेवाने त्याच्याशी मैत्री केली. ‘गरुडाने’ यशस्वीरीत्या अमृतकलश आणला. त्याचा अद्भुत पराक्रम बघून भगवंत प्रसन्न होऊन म्हणाले, “गरुडा! मला तुझा अभिमान वाटतो. मी तुला वर देऊ इच्छितो.” ‘गरुडाने’ भगवंताची स्तुति केली व अलौकिक मागणे मागितले, “देवा! मला अमृतापेक्षाही श्रेष्ठ असें आपले अखंड सान्निध्य हवे आहे, अन्य कांहींही नको.” भगवंत प्रेमाने म्हणाले, “तू आजपासून माझें वाहन आहेस व माझ्या ध्वजावर तुझे चिन्ह सदैव राहील.” ‘गरुड’ आनंदी झाला. त्रैलोक्याच्या स्वामीकडे निरपेक्ष मागणे मागितल्याने ‘गरुडाला’ त्रैलोक्यसंचाराचे भाग्य लाभले आणि अलौकिक सामर्थ्यप्राप्तीही झाली. हें ‘गरुडसामर्थ्य’ बोधप्रद आहे. मानवाने निराश न होता संकटांना सामोरे जाऊन क्षीण झालेले आत्मबल व इच्छाशक्ती बळकट करावी. असें सकारात्मक परिवर्तन आवश्यक आहे.

भगवंताच्या नित्य सान्निध्यामुळें, निष्ठेने केलेल्या सेवेमुळें ‘गरुडाला’ ऐश्वर्यसंपन्नता इत्यादि चिरकाल राहणारी ‘दैवीगुणसंपत्ती’ प्राप्त झाली. त्याची सूक्ष्मदृष्टी म्हणजे ‘दूरवर असलेल्या कोणत्याही वस्तु हेरण्याचे सामर्थ्य’ अतुलनीय आहे. या दैवीगुणसंपत्तीमुळेंच आजही ‘गरुडाला’ विश्वात मान व आदर आहे. विदेशात ‘गरुडाला’ राष्ट्रीय मानचिन्ह प्राप्त झाले. तसेंच भारतीय लष्करातील शत्रूस्थानांचे सूक्ष्म निरीक्षण करून हेरणाऱ्या विशेष पथकाचे ‘गरुड कमांडो फोर्स’ असें नामाभिधान आहे.

तात्पर्य, भारतीय संस्कृतीमध्ये, विठ्ठल पंचदेवतांमध्ये ‘गरुडाला’ देवतास्थान प्राप्त झालेले आहे. म्हणून संतश्रेष्ठ तुकाराममहाराज प्रार्थना करतात-

‘गरुडाचे पायीं|
ठेवीं वेळोवेळां डोई||
वेगी आणावा तो हरी|
मज दीनातें उद्धरी||’

……………………..

कृतज्ञ-कृतघ्न >>

<< देव भक्ताचे भांडण